भवानीनगर : प्रतिनिधी)
“तुम्ही मला कारखान्याच्या उत्कर्षासाठी मनापासून साथ द्या, मी तुमच्या पगाराची सात तारीख उलटणार नाही यासाठी प्रयत्न करतो,” असे नवनिर्वाचित अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना बोलता बोलता सहजपणे एक शब्द दिला आणि खरोखरच हा शब्द त्यांनी पाळला. छत्रपती कारखान्याच्या कामगारांचा पगार ६ जून रोजी त्यांच्या खात्यात जमा झाला.
पगाराच्या या वेळेवर झालेल्या अदा मागे एक रंजक कहाणी आहे. छत्रपती कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून, या परिस्थितीत कामगारांचा पगार वेळेवर करणे हे मोठे आव्हान होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समयसूचकतेने घेतलेला निर्णय आणि पृथ्वीराज जाचक यांची तळमळ यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.
पृथ्वीराज जाचक यांनी या आर्थिक अडचणीच्या काळात पुढाकार घेत, स्वतःच्या वतीने एक कोटी रुपयांची ठेव कारखान्यात अनामत स्वरूपात केली. त्याचाच परिणाम म्हणून कामगारांचा पगार सहा जून रोजी अदा करण्यात आला. ही बाब केवळ प्रशासनिक निर्णयापुरती मर्यादित न राहता, एका अध्यक्षाने दिलेला शब्द आणि त्याची पूर्तता याचे ज्वलंत उदाहरण ठरली आहे.
या अगोदर कारखान्याच्या कामगारांमध्ये पगार लांबण्याबाबत चर्चा होती. मात्र अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पृथ्वीराज जाचक यांनी सर्व आर्थिक आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी निवृत्त कामगार आणि नव्याने निवडून आलेल्या संचालकांचा एकत्रित सत्कार सोहळा झाला होता. या कार्यक्रमात कामगार संघटनेच्या वतीने सत्कार झाल्यानंतर जाचक यांनी कामगारांना कानमंत्र देत दिलासा दिला होता – “तुमच्या पगाराची तारीख लांबणार नाही.”
पगाराच्या तारखेबाबत दिलेला आश्वासक शब्द त्यांनी कृतीत उतरवून दाखवला. कामगार संघटनेनेही त्यांच्या या कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. मात्र, या बाबतीत संपर्क साधला असता जाचक यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
एकूणच, अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिलेला शब्द आणि घेतलेली तत्काळ कृती यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये समाधान आणि नव्या विश्वासाची सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या सुदृढतेसाठी आणि कामगारांच्या हितासाठी अध्यक्षांची ही सुरूवात आशादायक ठरत आहे.
0 Comments